Saturday 19 April 2014


गाडीच्या पायांनी वळणावळणांचा घाट कोरुन घेतलाय. ती पाय ठेवतेय तिथे तिथे धुक्याची रुमझुम. 

कास पर्यंत पोहोचू एवढ्यातच, पण तोवर हा हिरवा रस्ता कसा पार करावा ! 

इतक्या स्वच्छ हवेत श्वास कोंडताहेत . सेकंदा सेकंदाला सभोवतालातून अंगावर येणारा हिरवेपणा. तापच आहे च्यायला. तेच हिरवं क्रूर संगीत ! कोण कुठल्या मनःस्थितीत आहे, नाही कुणाला काय त्याचं ! मेंदूशी सारखी एकच सळसळती कुरकुर…  कुरकुर…  कुरकुर…  कुरकुर… 

कधी कधी इच्छा असो नसो, पोपटी झिलमिलती झाडं पहावीच लागतात. डोळ्याआड कशी टाकावी?. 

कशासाठी यांची एवढी वल्वल ? शांत बसावं जरा , झोपा म्हणावं पहाटेचं निवांत!  

मला गाडी चालवू द्या , शांततेनं. ही वाट पार करू द्यात. त्याच्या घरावरून पार होऊ द्या    

Tuesday 8 April 2014

झिनी झिनी बीनी चदरिया


झिनी झिनी बीनी चदरिया 

'अदभुत' शब्दाचा पसारा जसा व्यापक आहे, तशीच त्याची 'अदभुतता ' ही सर्वस्पर्शी आहे. कमी अधिक प्रमाणात ती प्रत्येकाच्याच जगण्यात रुजलेली आहे. पण 'अदभुततेची अस्सल आंतरिक ओळख व्हावी' असे भाग्यक्षण मात्र फार दुर्मिळ ! 'अदभुततेनं आपण सतत वेढलेले आहोत' याचं सजग भान कुठल्याशा क्षणी लखलखत समोर येउन उभं राहात आणि आपण केवळ थक्क होऊन पाहत राहतो . ही 'थक्कावस्था ' कुणाच्या आयुष्यात कुठे, कधी, कशी सामोरी येईल कुणास ठाऊक, पण एवढं खरंय की, अशा 'अदभुत ' गोष्टीं आयुष्यात याव्यात, याची स्वप्नं दिनरात पाहिली जातात. रोजच्या धकाधकीच्या जगण्याआड या स्वप्नांना मोठ्या निगुतीनं  जपलं जातं, त्यांची वाट पाहिली जाते. 

काहीतरी 'अदभुत' घडावं, पाहावं, जाणावं, भोगावं ही जीवघेणी आस…  कशासाठी? रोजच्या ' तोचतोपणाचा' दाह पेलावा म्हणून ? फक्त ? अदभुततेपायी होणारी जीवाची तलखी, तिच्या सहवासात झरझरणारी मेंदूची तरतरी काय काय अधोरेखित करते? मेंदूच्या कवाडांमागचे  हे रासायनिक पिंगे ! ते खेळता खेळता ' अदभुततेचा ध्यास' कित्येक जीवांना ' सदेही भूत' बनवतो. आपल्याला नेमकं काय हवं आहे, काय शोधायचं  आहे हे गवसेपर्यन्त कधी आयुष्याचा श्वास निखळतो, तर कधी हीच अदभुतं  जगण्याकडे पुन्हा पुन्हा वळवतात आपल्याला, अदभुताला जाणून घेण्याचं अनिवार आकर्षण आयुष्याचा केंद्रबिंदू ठरतं. 

या आकर्षणाने मला देखील माझ्या अगदी लहानपणापासून वेढलेलं आहे. आठ / नऊ वर्षांची असताना बाबांनी माझ्यासाठी आणलेली शंकराची एक निळीभोर मूर्ती… जिनं माझ्या त्या अधमुऱ्या आयुष्यावर अक्षरशः राज्य केलं. दिवसरात्र ती माझ्यासमोर उभी असायची. मी तिच्या आसपास… तिच्या निळ्या काळ्या डोळ्यात पाहायचं, भाषा शोधायची, विश्वाची गुपितं मागायची, गाॄहाणी सांगायची, खेळ मांडायचे. सगळं शंकरासाठी, त्याच्या साक्षीनं… 'सृष्टीतल्या कुठल्या कुठल्या अजब गोष्टींबद्दल मला तो सांगायचा. त्याने मला सृष्टी दाखवावी म्हणून मी हातपाय झाडून रडायचे . पण त्यानं कुठलेच चमत्कार मला दाखवले नाहीत . मग मात्र  'हा सर्वांच्या नकळत काहीतरी चमत्कार करीत असणार ' अशी माझी पक्की धारणा होत गेली.  तो  मात्र 'नाही' म्हणायचा. 

हळूहळू हे 'शंकरी' झपाटलेपण इतकं वाढत गेलं की त्याचा क्षणाचा विरह सहन होईना.शाळेत चैन पडेना.त्याच्यापासून दूर जाववेना.  हळूहळू मी शंकराच्या मूर्तीतच  शिरून बसायला शिकले. डोळे मिटायचे, शंकराला स्पर्श करायचा आणि त्याच्यासारखं थंड , अचेतन बनून त्याच्या मूर्तीत शिरायचं. फार गूढ, थंडगार आणि सुन्न अवस्था असावी ती. आसपासची गजबज शांत होत जायची, कानात किर्रर्र्र दडे बसायचे…आणि पाण्यात डोके दाबून धरल्यावर व्हावी तशी श्वासाची मरणप्राय तडफड… बस्स… हळूहळू मी त्या नीलमूर्तीत जखडले जायचे. मूर्तीतून घराच्या भिंती, कोपरे दिसायचे. माणसांचे पाय, त्याचं चालणं, थांबणं, बसणं, कचरा, गुंतवळं , केळीची सालं, झुरळं, कुत्र्याची पिल्लं, कुंचे, कपड्यांचे बोळे…आता दिवसातून कितीही वेळा मी अशी ये जा करू लागले होते त्या मूर्तीतून. खूप शांत वाटायचं , पण या कायाबदलाचा कठोर ताण यायचा माझ्यावर …थकून जायचे, पण सुटका नव्हती या ताणापासून. त्याची आणि माझीही. 

वय वाढत गेलं तसं वेडही ! रात्रीच्या गडद अंधारात आता मला शंकराचा तिसरा डोळा दिसू लागला होता. झोप उडाली. कपाळावर चिरेसारखा उभट डोळा. पापण्या नाहीत, बुब्बुळ नाही.  'तो तिसरा डोळा उघडावा' म्हणून आता माझ्या विनवण्या सुरु झाल्या. शंकराला हाका घालणं, रडणं-भेकणं, धमक्या.  तो बिचारा कुठल्या जन्मीचं  ऋण फेडत होता कुणास ठाऊक. रात्रंदिवस तोच पिच्छा.  अखेर हळूहळू शंकराच्या तिसऱ्यां डोळ्याची चीर जागी झाल्यासारखी भासू लागली. दार किलकिलू लागलं. 'त्या' जगातला विस्तव धुगघुगु लागला. आता डोळा अचेतन नव्हता. तो उघडणार होता. काहीतरी घडणार होतं, खूप काही घडणार होतं आणि ते फक्त माझ्यासाठी होतं. कदाचित सगळं बेचिराख होणार होतं किंवा काहीतरी नवीन जन्म घेणार होतं.  अदभुताची स्वप्नं आता पापण्यांवरून सत्याच्या उंबऱ्यावर उतरु पाहात होती… माझा लहानगा जीव पिसासारखा लवलवत होता. सुखानं उफाळत होता आणि एक दिवस काहीही न घडवता शंकर फुटून गेला. तुकड्यात पांगला. स्वप्न आटोपलं. मी संपून गेले. नंतर दिवसरात्र उरलेच नाहीत. फक्त काळ सरकत होता या दारापासून त्या दारापर्यंत. 
 
मनावर खरखरीत मोहाचा ओरखडा घेऊन मी बाजारातून फिरून आले. अनेक शंकर तपासले, हाका घातल्या, तो नाही मिळाला. 

अदभुताचा हात हातातून असा अकाली सुटून गेला. भेदरले मी. कुणासमोर जाववेना, कुणी डोळ्यासमोर पाहवेना. इतर अदभुत गोष्टींमध्ये रमून पाहिलं. दर आठवड्याला "टिंग - टिंग " टिमकी वाजवत येणारा डब्याचा सिनेमा, रेडीओ, मोहिंदर अमरनाथचे फोटो, "शिहू " नावाचा भाभीकडचा बोकड, "महाराजा " नावाचा माझा लाडका पतंग (ज्यानं कधीही न कट्ण्याचं वचन मला दिलं होतं) आणि चोरून घेतलेले रमचे घुटके … सगळ्याच गोष्टी अदभुत होत्या, पण त्या कशात शंकराची अदभुतता नव्हतीच. झाडावरच्या पानासारखं सर्वांत असून एकटं जगणं सुरु झालं. 

कालांतरानं शंकर विस्मरणात गेला. त्याच्या निळाईसह प्रेमात पडल्यावर जाणवलं की 'अदभुतता' आणि 'प्रेमाचा' गहिरा गूढ संबंध आहे ! एक गैरहजर असेल तर दुसरं त्याची जागा घेतं, दोघांच्या वाटची भिक्षा मागतं आणि माणसाचं पोट भरवतं. 

२००१ साली आईला फुफ्फुसाचा कर्करोग झाला आणि त्यानंतर तिचे उपचार, चाचण्या, केमो यांच्या माऱ्याखाली आम्ही चारी भावंडे झोडपली गेलो. दहा महिन्यांचा वेदनाकाळ. आई सगळ्या त्रासातूनही निखळ हसर्या गप्पा मारायची. ती स्वतः  गायिका आणि माझे वडील उत्तम तबला वादक होते . तिचं माहेर इंदोर - देवासचं. तिथल्या आठवणी, माणसं, तिचं गाणं , तिची शाळा, बालपण, भावंडं . डोळे भरून यायचे तिचे सांगताना ! देवासचं.कुमार गंधर्वांचं घर, त्यांचं गाणं , मैफली, त्यांचं  आजारपण…भरभरून बोलायची ती. कुमार तिचे मानलेले गुरु होते.  तिच्या आणि आमच्या सगळ्या घराला संगीताचा कान होता. मी मात्र लहानपणापासून शास्त्रीय संगीतापासून स्वतःला दूर ठेवले होते. काही विसंवाद होते. परिणामी माझी स्वरांची समज शून्यवत आहे. 

पण आईच्या आजारपणात मात्र विकल झालेल्या माझ्या श्वासकड्यांत  आईनं कळत नकळत 'कुमार ' नावाचा एक मुक्त निर्मळ स्वर गुंफून टाकला…तिच्या कुमारांबद्दलच्या गप्पांनी, गाण्याच्या स्पर्शानी मी बांधले गेले आणि…आता खरा धसका बसला ! या गाण्याकडे तर मी केव्हाच पाठ फिरवली होती न ! एवढी वर्षे जे गमवत राहिले ते गाणं आता नेटानं समोर उभं होतं. किती काळ गेला, किती आनंद गेले , स्वर साधकांच्या मैफली प्रत्यक्ष ऐकण्याच्या कितीक संधी गमावल्या ? काहीच कसे शिकलो नाही आपण ? आता ही ठसठसती मूक व्यथा माझ्या पदराला बांधून आई निघून गेलीये.  

संगीतानं हात हाती घेतलाय, पण कुठून काय ऐकावं, काय समजून घ्यावं ? कसं ? कशी ही वाट चालावी ? तडफड होतेय. आईनं कळत - नकळत कुमारांची वही माझ्यावरून उतरवलेलीये, तोच निर्मल आवाज इथे झुळझुळतोय ! मित्रानं दिलेलं कुमारांचं गाण्याचं भांडार… मी फक्त ऐकते आहे … एक पाचूचं  झळाळतं बेट माझ्या गुणसूत्रांत नांदू लागलंय, हिरव्या रस्त्यांचं, पोपटी दारांचं, आणि त्या दारांमागे उभीये ती… निळी अदभुतता… 

"सूझत नाहिं गान बिन मम कछु 
जानत तूहि सब जन नाहिं … !!"

गाण्याशिवाय दुसरं काहीही न सुचण्याची ही अवस्था तुझ्याशिवाय इतर कोण जाणू शकणार ! तूच तर जाणतोस सारं, तुझेच स्वर माझ्याबरोबर चालत आहेत !

मी रोज काही न काही ऐकत आहे… आसपास पाहत आहे… आसपासची दुनिया कुमारांची दिवाणी आहे . त्यांच्या बंदिशी, कबीर भजनं, 'गीत वर्षा, गीत हेमंत, ऋतुराज, त्रिवेणी , टप्पा ठुमरी, तांबे गीत' असे लकाकणारे अनोखे कार्यक्रम…. अथक , अजोड निर्मिती ! नवोन्मेषाची गाठोडी वाहून नेणारे ते स्वर आणि त्या स्वरतांड्यांना अपूर्व ताकदीनं हाकणारा हा अवलिया ! 

आता जुने निग्रह झोडपले गेलेत. सगळे कमकुवत दोर कापले गेलेत. स्वरांनी मला त्यांच्या कुशीत घेतलंय. ते माझ्याबरोबर चालतात, मला पडू देतात, उचलतात, स्वैपाक करताना ओट्यावर चढून गप्पा मारतात, गाडीपाशी माझी वाट पाहतात, मंडईत माझ्या डोळ्यांनी भाज्यांचा हिरवा प्रकाश पितात… आता मी जाणू शकतेय त्यांची व्याप्ती, त्यांची माया… हृदयातलं बोलू शकतेय त्यांच्याशी… सगळे मोसम आता आनंदी शांततेचे आहेत, आसपास स्तब्ध श्वास असण्याचे !

कदाचित हीच आहे का ती वेळ…. पाऊल न वाजवता स्वतःकडे निःस्तब्ध परतण्याची ? हीच आहे का ती वेळ …. गुणसूत्रांच्या उत्क्रांतीची? उत्क्रांती नंतरच्या जड्शीलतेची ? फांदीवरून गळून पडण्याची ? अलगद मातीवर उतरण्याची ? 

" ही अभिषेकाची वेळ आहे 
जगण्यातला 'धूळ - कचरा ', कळकट मळकट पणा टाकून देण्याची वेळ….  
संध्याकाळच्या यतीची वेळ… 
आरंभाची वेळ…। "

जीवनाचा आरंभ झाला आहे. एका जन्मात या पेक्षा अधिक काय मागावे ! ऋणी आहे मी आईची , त्या कुमारवेड्या मित्राची आणि कुमारांच्या या स्वर मायेची !!