Saturday 7 June 2014


ते वीजेचं पोर

सन २०११ - 

ऊ… ऊ  …ऊ … असा विचित्र  बारीक आवाज ऐकून मी घराचं दार उघडलंय. बाहेर एक मजेदार रंगाची मुठीत मावेल एवढी माऊ मनातल्या मनात ओरडतेय. मी आणि पायस 'पूर्णवेळ माऊप्रेमी'. लगेच झडप घालून तिला घरात आणलंय. 

" ई… कसलं पिवळबेंद्रं  मांजर आहे !!" इति विजय…  'अर्धवेळ माऊप्रेमी'.
"विजू, ही म्याऊ आहे, मांजर काय  म्हणतोयस ? आणि पिवळबेंद्रं ? !" माझा तीव्र नाराजीचा कटाक्ष. 

ही देसाई काकूंच्या पेनीची पहिली भेट ! काळसर ढगांच्या गर्दीत पिवळसर सूर्य लांब चेहरा करून पडून राहावा, तसा तिच्या काळया करड्या नाकावर एक पिवळट पट्टा सुस्तावल्यासारखा पडून आहे. तिचं अवघं रूप त्यामुळे मजेदार झालंय. तिच्या शरीराचा सगळा ताल आणि तोल तो सूर्याचा पट्टा सांभाळतो. कधी पेनीचा चेहरा उग्र दाखवायचा, कधी नरम, कधी अमाप आश्चर्य उधळायचं, कधी कुणाला उगाचच घाबरवायचं हे सगळं तो 'सूर्य-पट्टा' ठरवत असणार, अशी आमची खात्री आहे. तेच तिचं प्राथमिक हत्यार असावं . त्याशिवाय का ही घाबरगुंडी माऊ उगाच इकडे तिकडे रुबाबात फिरते पोराबाळांना धमकावत ? 

पेनी एकूणच सूर्याच्या घराण्यातली असावी. दिसतेय मवाळ म्हणून मायेनं जवळ जावं, तर क्षणात तिची  नजर जळजळेल, जर्द पिवळी बुबुळं नापसंतीनं नजरबंदी करतील आणि विचकलेले दात जन्माची भीती घालतील. लांबून काही बोललात तर "ऊ …. ऊ …." अशा प्रतिसादानं गप्पा सुरु होतील, मग त्या कितीही वेळ चालू दया, प्रोब्लेम नाही. लहानपणी गाडीखाली येउन मरता मरता देसाई काकूंच्या नातवानं, अमेयनं वाचवून ओंजळीत उचलून आणलेलं हे चिमुटभर पिल्लू…आता जमेल तेवढी माया सर्वांकडून गोळा करीत पेनीचा हा उग्र काळपट - वेडपट गड्डा भराभरा वाढतोय.  

सन २०१२ - 

याच्या त्याच्या घरात जात-येत डहाणूकर कॉलनीत पेनीनं झक्क जम बसवलाय. अलीकडच्या पलीकडच्या सोसायटीतल्या अनेक घरांमध्ये तिनं आपल्या संयत वागण्यानं घरोंदा निर्माण केलाय. "लिमिटेड प्रेम" कॅटगरीतली असल्यामुळे ती तशी स्वतःहून कुणाच्या अंगसटीस जाण्यार्यातली नाहीच . आपणहून जवळ आली तर भाग्य उजाडलं ! पण गम्मत म्हणजे कधीकाळी सोसायटीतल्या मोठ्या माणसांनी जिच्याविरुद्ध बंड पुकारत एकमेकांत भांडणं केली होती , ती सगळी आता तिची चाहती आहेत. तिच्या असण्यानं सर्वांना मूक सोबत मिळालीये. 

पेनी आता निवांत फिरते सर्वत्र. तिची काळजी नाही वाटत कुणाला. सतत संयत - सावध, विचारशील चाल आणि तीक्ष्ण कान यामुळे धोके कमी झालेत तिच्यापुढ्चे. मुलांबाळांकडून तिला "झेड कॅटेगरी" सुरक्षा पुरवली जातेय !  

सन २०१२ - १३

पेनीचा गृहपाठ लहानपणापासूनच पक्का आहे. संथ चालत आधी कुणाकडं जायचं , कुणाकडं जाऊन नक्की काय काय करायचंय याबाबतचा गोंधळ तिला खपत नाई . सकाळी देसाई काकूंकडे कॅट फूड आणि दूध प्यायचं , मग दुपारची झोप माझ्याकडे , मध्ये जाऊन वर्षाकडे दूध पोळी खायची, रात्री माझ्याकडे अंडी आणि मांसाहार ! रात्रीची झोप देसाई काकू किंवा वर्षाच्या घरात ! या पलीकडे पेनी कुणाकडे जाऊन काही मागेल असं नाही. मात्र दिवसभरात एकदा तरी ४-५ तासाची घट्ट झोप हवीच माझ्या घरात. पायस जिथे अभ्यास करतो तिथंच तिनं पलंगावर स्वतःला पसरलंय, जागा कमी पडली तर पायसच्या पायाला चावून तिनं जागा वाढवून घेतलीये आणि आता  अभ्यास गुंडाळून पायसही पसरलाय ऐसपैस. 

पेनीच्या प्रेमात पडणार्यांची संख्या दिवसेगणिक वाढतेय। 'अर्धवेळ माऊप्रेमी' विजयला घरात आल्याआल्या पेनीला पाहायचं असतं. 'मानसिक गुंतण्याचा त्रास होतो म्हणून प्राण्यांवर जीव जडू न देणारे वर्षाचे कुटुंबीय आता पेनीपुढे हार मानून तिच्या प्रेमात पडलेत. देसाई काका - काकू, त्यांची मुलगी, नातवंडे पेनीच्या वेळी अवेळी येण्यामुळे होणारी गैरसोय खुशीनं सांभाळून घेत आहेत. निनाद, धनू, इरा पेनीला पाहण्यासाठी येता जाता येउन जातात. माझ्या बहिणी, त्यांची पोरं मला भेटण्याचं निमित्त करून पेनीशी खेळायला धावत आहेत.         
 
लेकिन कुछ दिन से हमारी पेनी के तेवर कुछ बदले बदले से लग रहें हैं !! ती एका देखण्या, सुंदर फर असलेल्या बोक्याला वश झालीये. सोसायटीत कुजबुज सुरु आहे. डोळ्यांसमोर आकार घेणारी ही नवीन फ्रेश प्रेमकहाणी पाहून अंमळ अवाक झालेली सोसायटीतली पोरंबाळं मला येउन म्हणतात, "'हे काय पेनीचं वय आहे असंलं वागण्याचं ? ती आमच्याशी आता खेळतच नाहीये."  त्यांचा राग योग्य आहे. फक्त दोन वर्षांची त्यांची टॉमबॉय पेनी… कुणाला कधी भीक नं घालणारी, तुसडी, मारकुटी पेनी खुशाल आता दिवस दिवस त्या बोक्याच्या मागे जातेय ! कधी त्याला टाळतेय तर कधी कवटाळतेय ! "हमारी पेनी…हम ही से म्याव ?" 
 . 
सन २०१३ -

पेनीची सावध - संयत चाल आता अधिकच सावध-संथ-संयत झालीये. तिची तकाकी, डोळ्यातलं तेज मोठं मोहक दिसतंय. अंग भरलंय. ती गुब्री दिसू लागलीये, तिची भूक वाढलीये. "बाईसाहेब प्रेग्नंट दिसताहेत"… बायापुरुशात कुजबुज आहे. पेनीच्या कौतुकाला उधाण आलंय… 

आता पेनीची लगबग वाढलीये. ती सतत कपाटे,खोकी, मोकळ्या जागा , माळ्यावरच्या अंधाऱ्या जागा विस्कटतेय. खूप शोधाशोध करून, बारकाईनं अभ्यास करून बाळंत होण्यासाठी तिनं वर्षाचं घर मुकरर केलंय. वर्षाचे अप्पा , आई , भाऊ मनीष सगळे खुश झालेत. सगळ्यांनी तिच्या गरजांनुसार आपल्या कामकाजाच्या वेळा बदलल्या आहेत. देसाई काकूंनी तिच्यासाठी पौष्टिक खाऊचा खुराक स्वतःच्या हातांनी तयार केलाय. तिचं वेळी अवेळी येणं जाणं ,खाणं- पिणं सर्व आता सर्वांच्या देखरेखीखाली वेळापत्रकानुसार होतंय.  

५ जुलै २०१३ - 

दिवसभर देसाई काकू, वर्षा आणि इतरांकडून भरपूर सेवा करवून घेत पेनीबाई एकदाच्या संध्याकाळी बाळंत झाल्यात. पेनीचं बाळ पाहून तर रडूच आलंय सगळ्यांना. मांजराचं पोर डोळे दीपावं इतकं देखणं असू शकतं ? सायीसारखं गुलाबी शरीर, गवताच्या पात्यासारखे पातळ गुलाबी पाय, दाण्याइतके चिमुकले पंजे  आणि अंगावर काळपट राखाडी बुंदक्यांची रेशमी मखमल ….आनंदानं आम्ही सर्व वेडे झालोत. प्रत्येकानं दोघांसाठी दीर्घ आणि सुंदर आयुष्याची प्रार्थना केली आहे   पाण्यानं भरलेल्या असंख्य डोळ्यांनी बाळाची दृष्ट काढली आहे…टायगर…आमचा टायगर… वाघाचे बछडे जन्माला आलेय. संत्र्याची बर्फी वाटून जन्माचा सोहळा साजरा होतोय … 

ऑगस्ट - डिसेंबर २०१३ -

तेजतर्रार बदामी डोळ्यांचा गुब्रा गुब्रा टायगर अक्षरशः नाकात दम आणतोय सर्वांच्या. 
कसे सांभाळावे या दांडग्या वाघाला ?

"हे पोर म्हणजे अखंड उच्छाद आहे बाबा "
"अरे हा इथे ओट्यावर चढलाय ! झालं …पाडली भांडी सगळी "
"टायगर… अरे गधड्या, नको फ्रिजवर चढूस " 
"ए अरे बाळा, सोड पेनीचा कान… नको गळा पकडू तिचा, मरेल न ती" 
"आस्स …खा मार आता पेनीचा, तुला असाच मार पाहिजे म्हणजे सुधारशील जरा"

टायगर काही सुधारण्याचं नाव नाही. हा पोरगा अंगात वारा घेऊन आलाय का ? दिवसभर सोसायटीतल्या कुठल्या मजल्यावर, कुठल्या घरात हा असेल सांगता येत नाही. कुणाला तो वर्षाकडे खाताना दिसेल तर दुसऱ्या क्षणी पार्किंग मध्ये पेनीच्या अंगावर धाड धाड उड्या  मारताना दिसेल. क्षणात जिन्यांच्या भिंतींवरून घसरत खाली येईल तर पुढच्या क्षणी कुणाच्या गाडीचे सीट फाडायला बसलेला दिसेल. घरातल्या दोऱ्या, कुंचे, टरफले, गोळ्यांची पाकिटे, बाहुल्या, चपला, कागद, कपडे …. काही काहीच सुटणार नाही याच्या तावडीतून. कधी आपण हात हालवला म्हणून हात पकडेल तर कधी हात का नाही हालवला म्हणून शंकेनं  उडी घेईल हातावर. रात्री कुठेतरी कुणा मांजराला चोपाचोपी करेल, तर कधी पेनीबरोबर वर्षाच्या गाडीची वाट पाहत रात्री रस्त्यात लोळण घेईल.  पण एक आहे, तो तोडफोड नाही करणार कधी, नुसता अमाप खेळेल त्या गोष्टीशी , नासाडी नाही करणार. काहीच मनोरंजक नसेल तेव्हा हे साहेब भिंतीवरचे डाग पकडण्यासाठी सहा सहा फूट उंच उड्या मारत बसलेले दिसतील. 

सर्वांकडे टायगर साठी कॅट फूड, अंडी, मासे, चिकन तयार असणारच. कारण हा पोरगा कधी काय मागेल याचा भरवसा नाही आणि ते मिळेपर्यंत असा गळा काढून रडेल, ओरडेल की घराघरातून "टायगर का ओरडतोय पहा रे जरा " असे हाकारे सुरु ! परवा रात्री इतका उंच झाडावर जाऊन बसला की उतरवता उतरवता आमची दमछाक. रोज वर्षाच्या घरात हा वारं प्यायलासारखा हुन्दड्तो, हव्या त्याच शालीत गुरफटून बसतो, आई अप्पा त्याचे पाय दाबून देतात. त्याला झोप नाही आली तर रात्री मनीष त्याला खांद्यावर टाकून फिरत थापटून झोपवतो तीन तीन तास.  देसाई काकूंकडे झोपाळ्यावर गालीचा घेऊन ठराविक जागीच तो झोपतो.

माझ्या घरात मासे खाताना त्याची उडणारी धांदल पाहणे म्हणजे "याची कानी याची डोळा " असा विलक्षण सोहळा आहे. मासे पाहून हा इतका उल्हसित आणि उत्तेजित होतो की तोंडातून "नम नम नम नम नम नम नम नम " असे मजेशीर आवाज काढत, उडत बागडत लवलवत मासे फस्त होतात. हे "टायगरचे मस्य-स्तोत्र" ! हा एक इतका आनंददायी आणि देखणा आविष्कार असतो की माशांनाही त्याच्या तोंडी जाताना सार्थक वाटावे ! अर्थात स्वतःचे मासे खाऊन त्वरित पेनीच्या पुढची थाळी ओढून ती देखील साफ करणं तो विसरत नाही. पेनी हताशपणे युध्द हारत दूर बसून राहते. 

सध्या आम्ही सगळे त्याच्या उनाड मस्तीत इतके बुडालेलो आहोत की दिवसाचे २४ तास अपुरे पडताहेत. वर्षाला टायगर दिसला नाही तर काही सुचत नाही. तिचे त्याच्याशी सतत संवाद चालतात. भांडणे सुद्धा. टायगर बद्दलचे तिचे निष्कर्ष मोठे मजेदार आहेत. ती म्हणते, टायगर तिला माणूस नाही, मांजरच समजतो. तो तिच्याशी खूप बोलतो !! मात्र टायगर दिसला नाही तर सगळे सैरभैर होतात आणि त्याला रात्री अपरात्री देखील शोधून घरात आणतात. त्याच्या मागे मागे करण्यात, त्याला खेळवण्यात, खाऊ घालण्यात अपार आनंद आहे. वर्षाचे आई, अप्पा, देसाई काका, काकू सगळ्यांचेच ब्लड प्रेशर आता अचूक कोपऱ्यात बसलेत. 

टायगर आता अगदी मस्तवाल रांगडा गडी झालाय. रोज मस्त दमदमून खाणे, मासे चिकन ओरपणे, कधी खवा, मलई मटकावणे, दिवस दिवस उद्दामपणे रेटून खेळणे, मनसोक्त उड्या मारणे या रोजच्या प्रोग्राम मुळे टायगर इतका तकतकीत आणि धष्टपुष्ट झालाय की त्याच्यावर नजर ठरत नाही, कोणाची बिशाद आहे त्याला हात लावण्याची ? मात्र रोज त्याच्यावरून दृष्ट ओवाळून टाकण्यात वर्षाची आई आणि देसाई काकू चुकत नाहीत.
 
जानेवारी २०१४ - 

पेनी धावत ओरडत माझ्या नव्या घरात आली आहे. का आली गं बाळा अशी किंचाळत ? काय झालं ? काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय. तेवढ्यात वर्षाचा फोन. टायगरला ट्रान्सफ़ोर्मर चा प्रचंड धक्का बसलाय. अरे देवा !! सगळे हॉस्पिटलमध्ये, त्याला ताबडतोब उपचार दिले जाताहेत, इंजेक्शन , सलाईन, औषधे. तो सपाट पडलाय, डोळे बंद आहेत , खूप धाप लागलेल्या अवस्थेत वर्षाला चिकटून बसलेला टायगर अक्षरशः फडफडतोय, छातीत श्वास मावत नाहीये. हा आपला टायगर ? हाच तो? त्याचा मानबिंदू असलेली त्याची रेशिमकांती… कुठे गेली ती कांती ? हे … हे … जळलेले, फाटलेले, विस्कटलेले , काळवंडलेले केस… कुणाचे ग? हे प्राणहीन मिटलेले डोळे… कुणाचे? टायगरचे? आणि त्याचा तो भसाडा आवाज कुठाय? गेला ? कुठे? अगं काय झालं ग हे ? उठ रे बाळा . ओरड जरा. खूप ओरड, रड, त्रास दे, उड्या मार , नासधूस कर हवी तेवढी… पण … पण गप्प बसू नकोस असा… दोन दिवस असाच मूक आहेस तर दोन दिवस तपासारखे झालेत, काल सरपटत एकेकाच्या कुशीत जाऊन झोपून आलास ना… शाना बेटा आमचा … बाहुली घे तुझी ही आवडती. ठेव जवळ. आता बरा होशील हां बाळा उद्यापर्यंत. विश्वास ठेव . का असा केविलवाणा पहातोयस ? का ही आसवं ? काय सांगायचंय ? घशात आवाज का अडकतोय ? ही उचकी…. हे आचके ? टायगर सगळ्यांकडे पहा बेटा, बघ सगळे आहेत जवळ तुझ्या…डोळे उघड… उघड ते तेज, पाहू दे एकदा तुझी ती वाघाची नजर ! नको दूर जाऊस… नको जाऊस टायगर … आमच्या लाडक्या बाळा…. 

तो शांत. शांतच. तुफानी शक्तीचं, वाऱ्याच्या लहरीच ते पोर थंड जमिनीवर मान मुडपून हातपाय जोडून झोपी गेलंय. सगळ्या प्रार्थनांच्या, विनवण्यांच्या पलीकडे. 

वीजेचंच पोर  …. आज वीज त्याला आपल्या घरी घेऊन गेली.