Monday 19 October 2015


श्वास कथा - २ 
'ध' चा 'मा'

पलिकडच्या रस्त्यावर तो होता .  तोच..  त्याची ती गद्देपंचविशीत आलेली स्कूटर आणि तिच्यावर बेंगरूळ स्वार झालेला तो.. बरं झालं इथंच भेटला ..

तिनं गड़बड़ीनं हात वर नाचवून थांबायचा इशारा केला, तो बर्फ। उड्या मारून पाहिल्या, तो थंड, येड्यासारखं रस्त्यात शुक शुक केलं , तो ढिम्म

त्यानं पाहिलं होतं तिला , नक्कीच .. पण तो थांबला नाही.

चिडून तिनं फोनवरून उलटं पालटं झापलं लगेच। "तू टाळलंस ना मला... खचितच  पाहिलं होतंस . "

" अरे नाई बाबा, काहीतरीच असतं तुझं .. किती चिडतेस  ..काई आभाळ नाई कोसळलय  ... "

हा 'संजय'  ..नेहमी हां सांगेल तेच खरं , माझ्या भोवती 'धृतराष्ट्राचा' फास  ..

"काई बोलूच नये बाबा तुझ्याबद्दल "

" अगं कसले घट्ट दावे तुझे हे  ..नै म्हणलो ना  ..मग !!! 'खचित' वगैरे काही नाही.. हां, 'कदाचित' पाहिलं असेन मी..! अगं 'ध' चा 'मा' होतो कधीतरी .. तू 'ध' चा 'मा' करायला थोड़ी जागा ठेवत जा ना .. परिवर्तनाला थोड़ी मोकळी जागा लागते आपल्या शब्दात, अक्षरात .. वेगळ्या  शक्यता, वेगळे अर्थ .. सगळे तारक - मारक, योग्य - अयोग्य, सुष्ट - दुष्ट, भलं - बुरं सगळं डोलू द्यायचं आपल्यात  .. कशाला एवढे दाट हट्ट तुझे ? पाहिलं असेनही मी..कदाचित खचितही पाहिलं असेन मी तुला ... किंवा नसेनही ..."

ती ऐकत राहिली ...धृतराष्ट्राच्या' मुग्धतेनं ! डोळे मिटून ...कदाचित न मिटताही !






Monday 25 May 2015




तुझ्या माझ्यात…. 

अशीच असू देत मावळतीची केशरी तलखी ….  
टाकलेल्या जगावरचे सूर्याचे अस्तंगत कवडसे…. 

असू देत अशीच वाऱ्याची तिरपागडी शीळ आणि 
पोटात तुटणारं शेतांचं पोपटीपण…. !

असू देत अशाच कावळ्यांच्या कोऱ्या करकरीत काळ्या झेपा 
आणि मुठीत न उमललेल्या मोगऱ्याच्या ढासळलेल्या धवल कळ्या…. 

काही न उमलणं म्हणजेच काही न संपणं असतं नं 
ते … ही…. तसंच राहू दे … 

तुझ्या माझ्यात….