Friday 28 February 2014

आमचा सुहास काका (सुहास शिरवळकर)

२८  फेब्रुवारी , २०१४ 

आमचा सुहास काका 

सुहास काका आमचा सर्वांचा लाडका काका. कळत्या - नकळत्या वयात 'येणं' असो अथवा 'वयातून पार होणं ' असो, आम्ही शिरवळकरांची पोरंबाळं हटकून वाढवल्यासारखी सुहासकाकाच्या छायेतच वाढलो. लहानपणी मुंबई - कोकणातून भावंडांचे डेरे मे च्या सुट्टीसाठी पुण्याला आजोबांच्या वाड्यात येऊन दाखल व्हायचे. मग पहाटे पर्वती, दिवसभर मुक्त भटकंती, अखंड भांडणं, बेसुमार मस्ती , वेळी अवेळी कॉफी, पत्ते, कॅरम, क्रिकेट, गाणी आणि दमेपर्यंत रात्र रात्र गप्पा ! महिनाभर हाच उद्योग ! २०-२५ च्या संख्येनं कुठेही, कुठल्याही क्षणाला लगडणाऱ्या आमच्या छळवादी कंपूला फुलासारखं हाताळणारा एकमेव होता 'सुहास काका' ! 'सकाळपासून स्वच्छ मिश्किल हसत, मांड्यावर 'टपटप' करीत, दिसेल त्याच्या खोड्या काढत वावरणाऱ्या सुहासकाकाला पाहणं' म्हणजे पावसानंतर धूळ झडलेलं बहाव्याचं प्रकाशमान झाड पाहिल्यासारखं वाटायचं. काका जिथे असेल तिथे आभाळाएवढे हशे, टाळ्या आणि खळखळाट. कुणीच त्याच्या प्रभावापासून दूर राहू शकायचं नाही. भाषा, प्रदेश, समाज, वय, प्रतिष्ठा, व्यवसाय…कुठलीच कुंपणं त्याच्या कधी आड येऊ शकली नाहीत. तो सर्वांपर्यंत आणि सर्व त्याच्यापर्यंत पोहोचत राहिली… विनासायास.

भाषेवर त्याचं उत्तम प्रभुत्व. ती वाकवून, मुरडून हवी तशी वापरण्याची हातोटी होती त्याच्यापाशी. बेफाम लोकसंग्रह, कुठेही केंद्रस्थानी ठेवणारी अद्भुत विनोदबुद्धी, कुठल्याही अनुभवाला भिडायची लख्ख तयारी अणि इवल्या इवल्या गोष्टींवरही तुटून प्रेम करण्याची आत्मशक्ती ! सुहासकाका एक विशेष रसायन होतं. हे खेळकर  रसायन लहानपणापासूनच आमच्या अंगात भिनत गेलं आणि त्याच्या छटा वाढत्या  श्रेणीनं आयुष्यात रंगत आणत गेल्या. शाळा- कॉलेजात असताना काकाची ओळख सांगितल्यावर "ओ हो !!! ते तुमचे काका का ? " असा मनोहर मुग्ध विस्फार आमच्या सर्वांच्याच परिचयाचा असायचा. माणसं भारावून बोलायची. मला तेव्हा त्याच्या या लोकप्रियतेची मजा वाटायची. लोकांचं लेखकाला असं परमेश्वर स्थानी मानणं, त्याच्याबद्दल भरभरून बोलणं, त्याची पूजा करणं, त्याच्यासाठी रडणं वगैरे मला 'वहावणं' वाटायचं. मी काकाच्या पुस्तकांबद्दल पारायणवादी होतेच, पण मला वाहवणं जमायचं नाही. कुणाच्याच बाबतीत नाही जमायचं. मात्र काकाकडे पुण्याला शिकण्यासाठी आले, त्याला खूप जवळून बघितलं आणि काकाच्या या बिनतोड़ लोकप्रियतेचं गणित मला सहज उलगडलं !

लहानपणी गणित सोडवताना कित्येकदा निःशेष भागाकार मिळावा म्हणून "हातचा एक" घ्यावा लागायचा. हा "हातचा एक" म्हंजे काय ? कोण ? कुठून येतो? कसा येतो ? कशासाठी येतो याचं मला नेहमीच कोडं पडायचं. पण तो "हातचा " सगळं गणित सोपं करून जायचा. थांबलेली प्रक्रिया पुढे सरकायची आणि गणित उत्तरापर्यंत जाऊन पोहोचायचं. काका अनेकांच्या आयुष्यातला असा "हातचा एक" होता. तो सहजी त्यांच्या थांबलेल्या गणितात सामावून जायचा आणि माणसांची गणितं उत्तरापर्यंत पुढे सरकायची. " तो आहे " या एका विश्वासावर, त्याला प्रत्यक्ष न भेटता देखील त्याच्या लेखनातल्या अदृश्य जीवनशक्तीतून अनेक आयुष्यं मार्गस्थ झाली. त्याचा हात ममतेनं पाठीवरून फिरला आणि आत्महत्येच्या दोराला शिवून आलेले कोवळे दुर्दैवी जीव आयुष्यं पेलायला पुन्हा सज्ज झाले. मी हे सगळं खूप जवळून पाहिलं आणि सुहासकाकाच्या समाजमान्यतेचं कोडं मला अलगद उलगडलं. समाजांच्या इतिहासात याची नोंद आढळणं सर्वस्वी अशक्य आहे, पण कुटुंबांच्या, पिढ्यांच्या इतिहासात त्याच्या या अमोल सहभागाची मोजदाद खात्रीनं होईल हे मी जाणून आहे. 

काकाच्या सान्निध्यात आमचं बालपण खऱ्या निर्भेळ्तेनं मोठं झालं. वेदना मागे ठेऊन जगण्याची मजा घ्यायला आम्ही शिकलो. परिस्थितीकडे डोळस संवेदनेनं पाहत इच्छा, आकांक्षा, वासना यांचे ताणतणाव स्वच्छ प्रामाणिकपणे झेलू लागलो. बागांतली तजेलदार रंगबिरंगी फुलं मिळूनही रस्त्यावरच्या सूर्यप्रकाशात अखंड निथळणारा हा बहावा आम्हाला पदोपदी खिळवत राहिला. 

शनिवारातल्या माझ्या छोट्याशा हॉटेलवर काका दिवसांतून दोन तीनदा तरी यायचाच. झणझणीत मिसळ खाताना प्रदीप्त चेहऱ्यानं "आहा…मजा आली" असा त्याचा कौतुकाचा उद् गार मला मोहरवून जायचा. त्याचं ते आवर्जून "आस्वाद "ला येणं, आवडते पदार्थ त्यांच्या प्रेमात डुबून डुबून खाणं मला भयंकर आवडायचं. मग कॉफी , गप्पा, हशा, अश्लील जोक्स सुद्धा. त्याच्या येण्यानं दिवसभराचा थकवा गायब व्हायचा. एवढी जीवनशक्ती हा माणूस रोज कुठून आणायचा ?   

त्याच शक्तीनिशी विनातक्रार तो मृत्युसमोर उभा राहिला. क्षणाचाही विलंब न करता आपली श्वासांची कडी सोडवून घेतली आणि पसार झाला. त्याच्या अकाली जाण्यानं आमच्या आयुष्यात पोकळी नाही निर्माण झाली. लाकूड चिरफळावं तशी आमची जगणीं दोन भागांत चिरफाळली गेली…. एक त्याच्या सह…एक त्याच्याविना… !!