Friday 17 October 2014


श्वास कथा 
(उभ्या आडव्या - तिरप्या तारप्या श्वासांच्या क्षणभंगूर कथा )

श्वास कथा - १
विग  

विरळ गर्दीच्या रेस्तौरांत चेहऱ्यावर हसू थापून बसलेली ती…. शेजारच्या खुर्चीवर. ही तीच आहे नं ? केस वाऱ्यावर भुरभुरताहेत, पण त्यानं ओळखलं, हा विग दिसतोय हिच्या डोक्यावर. हिचे केस असे थोटके, काळे -कुरळे नव्हतेच हा कधी. जरा बेताचे लांब, पांढरट करड्या छटेचे… कधीतरी मायेनं हात फिरवावा असे वाटण्याजोगे …काय हे ? त्याला राग आला ! पण तो असा फसला जाणारा नव्हता … त्याला एकाएकी तिला पहावंसं वाटेना.  

बराच वेळ शांतता. ती शांत… अपेक्षेपार खुर्चीत खोचलेली. दोघांतली शांतता पीत. त्यात काय, कितीक नवरा बायको, मित्र - मैत्रिणी  रेस्तौरांमध्ये असे बसतात की… माठ शांतपणे. आपल्याला इथं कुणाला काही विचारायचं नाईये .  "आमटी वाढू का? भाजी ? ठीक झालीय का? एखादी पोळी घ्या की अजून" !!! आपण आणि आपलं ताट. 

समोर दोन खुर्च्या. रिकाम्या. रिकाम्या सावल्यांच्या. झाडं हात सोडून बसलेली. दूर दूर एखाद दुसरं माणूस हलतंय. कुणीसं इथं आपल्यात येऊन बसलं तर? त्याला विचारानं सुखद वाटलं. 

मधेच शांततेनं शांतता पेटावी तसा तो तिच्याकडे वळला .

"विग घातलायस नं ? कायतरीच करतेस! " त्यानं नाक मुरडून श्वास सोडला मोठा. जसं आहे तसं न दाखवण्याचं फॅड सगळं हिचं सालं… 

ती फिसफिस हसली.  नेहमीचंच. टिंगलखोर!

तो पहात राहिला, 'दात पण दुसरे लावून आलीये बया' ! चार सुळे त्यानी ओळखलेच लगेच!

"घरातल्या मांजरीचे दात लावून आलीयेस ना, how disgusting!" त्यानं मणभर तिरस्कार ओतला तिच्यावर.  

"नाई हो, कायतरीच तुमचं" परत टोचरी मिश्किलता… "आणि तसंही दूध प्यायला दात कशाला लागतात मांजरांना ?" पुन्हा फिसफिस … चार सुळे टिकटिकले.

त्यानं मान वळवून टाकली. आता तो आणि त्याचा ग्लास. बास !!! ती तशीच हसू माखून. विग आणि जास्तीच्या चार दातांसकट. हिच्यातून काय उपसून काढावं म्हणजे जरा निभावू शकू हिच्याबरोबर अजून थोडा काळ ! याच्याभोवती बधिर थकवा. 

एवढ्यात समोर मित्र.  आता तो खुलला. दोघां मित्रांनी प्रेमात असल्यागत एकमेकांना जवळ ओढलं. मगाशी पाहून न पाहिल्यासारखं केलं होतं  तरी आत्ता ते जीवाभावाचे दिसत होते. 

"ही मैत्रीण माझी" त्यानं मित्राला सांगितलं. तिनं नमस्कार केला. "हा पण जुना मित्रय माझा" ती मित्राकडे पाहून हळूच नाजूक हसली, मान लववून. दात न दाखवता.  

" आणि ही माझी फ्रेंड… गर्ल फ्रेंड नाही हा"…नुसती फ्रेंड ….  हैं हैं हैं …हैं हैं हैं "

स्वतःच्या शब्दांनी त्याला एकाएकी विलक्षण तरतरी आली, शरीर विजयी वाटू लागलं. तो आतून डोलू लागला. 

तिचा चेहरा बिकटला. अनियंत्रित वेडावाकडा होत चौकटी मोडून फुटला. विग विरघळून पायाखाली कोसळला. जास्तीचे चार दात गळून पडले. नजर संपल्यासारखी ती मित्रांमधून दिसणाऱ्या अवकाशाच्या तुकड्याकडे पाहू लागली. 

"पण….  ही पण जुनीच हा, खूप जुनी मैत्रीण माझी "… तो पुटपुटला. मित्र अजून काहीबाही बोलू लागला. 

नंतर काही क्षणांनी त्यानं पाहिलं, ती तिची सावली खुर्चीत सोडून रेस्तौराबाहेर पडत होती.