Tuesday 4 March 2014


एक चूक सूर्याची 
(बालांसाठी विज्ञानकथा)


सूर्यानं हातपाय ताणून चांगला आळस दिला. डोळे उघडून इकडे तिकडे पाहतो तर त्याच्या आभाळाच्या महालात गुडुप्प अंधार ! 
हे काय ? एवढा कसा अंधार आपल्या महालात ? …. अरे हो, आपण उठल्याशिवाय हा अंधार थोडाच जाणारे ? 

डोक्यावर हात मारत तो उठला. होताच तसा तो थोडासा विसराळू, अधून मधून छोट्या छोट्या चुका करणारा. पण बाकी आपल्या कामात  एकदम तरबेज ! प्रत्येक क्षणाला विश्वाला प्रकाश, उष्णता, ऊर्जा देण्याचं त्याचं काम बिनबोभाट चालू आहे. आहे कुणाची काही तक्रार ! 


सध्या तर त्याच्याकडे सृष्टी निर्माण करण्याचं फार महत्त्वाचं काम आहे. पाऊस, वारा, डोंगर, दऱ्या, झाडं, पानं, फुलं, पशु - पक्षी, नदया, समुद्र आणि आणखीही काय काय !! किती परिश्रमानं त्यानं ही सृष्टी रंगीबेरंगी फुलांपानांनी नटवली आहे. 

हळूच इकडे तिकडे पाहत चोर पावलांनी सूर्य महालाच्या दारात आला. दाराआडून गुपचूप बाहेर डोकावला. कुठं बरं लपली असतील ही बदमाश किरणं? सारखी आपली मागावरच असतात आपल्या. जरासुद्धा सुटका नाही त्यांच्यापासून. रात्री झोपण्याआधी त्यांना जबरदस्तीनं अंगावरून काढून ठेवलं तरी सगळीच्या सगळी महालाबाहेर पहारा देत लपून बसतात. सकाळ झाली की मारल्याच उद्या अंगावर बदाबद ! फार चिकट जात आहे बुवा ! काय करावं ? 

स्वतःशीच बारीक आवाजात पुटपुटत सूर्यानं दाराबाहेर पाऊल टाकलं आणि दाराआड लपलेल्या शेकडो किरणांनी दणादणा त्याच्या अंगावर उड्या ठोकल्या ! 

च्च… काय ताप आहे हा ! वर्षानुवर्षं या खराट्यांना घेऊन का बरं फिरायचं मी ? बिचारा केविलवाणा झाला. कारण रोजच्यासारखं त्याच्या अंगावर सर्वात आधी चिकटण्यासाठी किरणांचा कोण गोंधळ ! 

अखेर शेवटच्या एका बालकिरणाला अंगावर बसवून घेत ही वरात जेव्हा चालू लागली, तेव्हा सूर्याचं चिडणं हळूहळू वात्सल्यात बदललेलं होतं. " खरंच , का बरं रागावतो आपण आपल्या किरणांवर? किती माया करतात ही आपल्यावर, आणि या किरणांशिवाय मला कुणी सूर्य तरी म्हणेल का ?" सूर्य शांत हसला आणि विश्वाची सोनेरी पहाट झाली. 

त्याचं आगमन झाल्या झाल्या त्याच्या मागे हा मोठ्ठा गोतावळा. पाऊस, वारा, प्राणी, पक्षी सगळे आपली गार्हाणी मांडायला हजर ! सृष्टीची निर्मिती नुकतीच सुरु झाली होती. एवढ्या मोठ्या कामात कुठं नं कुठं, काही नं काही घोटाळा राहून जायचाच , नाही का? त्यातून प्रत्येकाला आपल्या आवडीचं काम देणंही किती मुश्किल ! 

पाऊस म्हणाला, " रविराजा, मी सरळच्या सरळ का बरं पडायचं ? मला छानसं, वळणा- वळणाचं, नागमोडी बनव ना तू. पृथ्वीवरचे ते नाग, साप किती वळसेदार आहेत बघ. मला पण सापांसारखं नागमोडी व्ह्यायचय." 

पाऊस अगदी हटूनच बसला. शेवटी सूर्यानं आपली किरणं त्याच्या अंगावरून फिरवली आणि पावसाच्या सरी नागमोडी होऊन बरसू लागल्या. 

वाराही वैतागला होता. म्हणाला, " भास्करा, नुसतंच इकडून तिकडून किती वाहायचं रे मी? त्या काळतोंड्या ढगांची राखण करायची, उनाड पावसाला वाहून न्यायचं , पृथ्वीचा केर काढायचा… ही कसली बाबा कंटाळवाणी कामं ? काहीतरी नाजुक, पुरतील अशी काम दे नां रे मला ! "

काय कामं  द्यावीत बरं या अवखळ वाऱ्याला ? कितीही कामं दिली तरी आपल्या अफाट वेगानं सगळी कामं तो चुटकीसरशी संपवून टाकतो. सूर्य विचारात पडला. 'थोड्या दिवसांनी मनासारखं काम देतो' असं सांगून त्यानं वाऱ्याची बोळवण केली.  

इतक्यात आभाळात दूरवर चाललेला कोलाहल सूर्यानं पाहिला. खूपसे पशू, पक्षी, नदी नाले, फुलं रडत ओरडत सूर्याकडे धावत येत होती. सूर्याजवळ आल्या आल्या नदी रडता रडता म्हणाली, " दिनकरा, वाचव रे बाबा आम्हांला ! तू आम्हांला सगळ्यांना जन्म दिलांस, पण या गर्विष्ठ डोंगर - पर्वतांना मात्र आम्हांला चिरडायला मोकळं सोडून दिलंस का ? पृथ्वीवर बघ, तुझे डोंगर- पर्वत कसे गर्वानं फिरताहेत सगळीकडे आणि त्यांच्या मोठ्ठ्या अंगांखाली सगळी झाडं, पशु पक्षी, तुझी लाडकी फुलं कशी चिरडली जाताहेत ! कसं जगावं सांग बरं आम्ही ? " 

" ऑ ? " सूर्याचे डोळे अविश्वासानं विस्फारले, " काय सांगतेस काय ? चल चल बघू बरं " 

त्यानं घाईघाईनं पृथ्वीवर डोकावलं, तर खरचंच त्यानं मोठ्या कौशल्यानं बनवलेल्या आल्प्स, सह्याद्री, काराकोरम अशा महाकाय पर्वतरांगा पृथ्वीवर मजेत फिरत होत्या , पण गर्वानं नाही तर अतिशय आनंदानं सृष्टी न्याहाळत, निसर्गाचं गुणगान करीत, हसत खेळत, गाणी गात ते भटकत होते. आपल्या अवाढव्य अंगांखाली ही नवीन सृष्टी चिरडली जातेय याची बिचार्यांना कल्पनापण नव्हती. आपल्याच मस्तीत सूर्याच्या स्तुतीची गाणी गात ते अजस्त्र पर्वत विहार करीत होते. 

चूक खरी सूर्याचीच होती ! त्यानंच तर त्यांच्या अगडबंब शरीरांना ' चालतं ' केलं होतं आणि पाहता पाहता त्याच्या एका चुकीमुळं नव्या नवेल्या सृष्टीची धूळधाण उडाली होती ! 

माझी फुलं चिरडली ? माझ्या रंगीबेरंगी सृष्टीचा नाश झाला ? सूर्याच्या तोंडून शब्द फुटेना. एवढी मोठी चूक ? माझ्या हातून ? स्वतःवरच चरफडत चिडत सूर्यानं आग पाखडली. त्याच्या डोळ्यांतून संतापानं ज्वाळा सांडू लागल्या. समोरचे प्राणीगण घाबरून थरथरू लागले. आता काय होणार या कल्पनेनं सृष्टी भयभीत झाली. 

" पर्वतांनो…. , जिथं आहात तिथंच थांबा " सूर्याची जळजळीत आज्ञा विश्वाच्या कानाकोपऱ्यात धडकली. " ज्या उन्मत्त गतीमुळे तुम्ही माझ्या लाडक्या सृष्टीला पायदळी तुडवलेत, ती गती या क्षणापासून मी तुमच्याकडून काढून घेत आहे. काढून घेत आहे तुमच्या अंगाखांद्यावर खेळणारं हे जीवन, ज्याचं भान न ठेवता भटकलात तुम्ही आणि चिरडलीत माझी फुलं… आता राहा असेच उघडे आणि बोडके, आयुष्यभर  !! हीच तुमची शिक्षा ! पण मी उद्या उगवेपर्यंत सगळी जमीन पुन्हा फुलांनी सजलेली दिसली नाही तर या विश्वातून तुम्ही कायमचे नामशेष झालातच म्हणून समजा, जा चालते व्हा आणि ताबडतोब कामाला लागा !!!" कडाडून आज्ञा देत सूर्य दाणदाण पाय आपटत तिथून चालता झाला. 

पर्वतांनी ही आज्ञा ऐकली, मात्र दुःखंवेगानं त्यांना मूर्च्छा आल्यागत झालं. ते जोरजोरानं रडू लागले. आपली गती नाहीशी होणार ? आपण कायमचे बोडके होणार ? नाही नाही. त्यांचा अवाढव्य जीव व्याकूळ झाला. आणि कामाला तरी काय लागणार कर्माचं ! बिचारे एका जागी खिळून ऊभेच आपले ! असहायपणे रडून रडून त्यांनी इतका कहर केला की पृथ्वीपुढे    महापुराचं नवीन संकट उभं राहिलं . पर्वतांचा तरी काय दोष होता ? चूक कुणाची आणि कुणा निरपराधांना केवढी मोठी शिक्षा मिळाली ! 

सृष्टीतल्या प्रत्येक जीवाचं मन व्याकूळ झालं. काही झालं तरी हे पर्वत त्यांचे सगेसोयरे, त्यांचे मित्रच होते नं! पर्वतांना संकटात एकटं सोडून देणं शक्यच नव्हतं कुणाला. 

वारा , नदी, पशू - पक्षी, कीडे, फुलपाखरं साऱ्यांनी विचार सुरु केला. काय करावं ?  तो क्षण मोठा अद्भुत होता, जेव्हा विश्वातला प्रत्येक घटक एक आणि एकच प्रश्न सोडवू पाहत होता. फुलांची दुनिया पुन्हा कशी फुलवावी ?

वाऱ्याची बुध्दी त्याच्यासारखीच तेज ! त्यानं युक्ती लढवली. 

उध्वस्त झालेल्या फुलांमधून वाऱ्यानं इवले इवले खूप सारे परागकण गोळा केले, त्यांना लांब लांब वाहून नेलं आणि विखरून टाकलं ओसाड पर्वतांवर, जमिनींवर. तिथं त्या परागकणांमधून नवीन फुलांनी जन्म घेतला. 

पाण्यानं आपल्याबरोबर कितीतरी परागकण वाहून दूर दूर नेले आणि विखरून टाकले आसपासच्या झाडाझुडूपांवर, शेतांमध्ये. तिथेही त्या परागकणांमधून नवीन फुलं जन्माला आली.  
  
फुलपाखरं, कीडे, मधमाशा, कीटक, पक्षी यांनी उंच उंच जागांवरचे वेगवेगळे परागकण उचलले आणि आपल्या पायांवर, पंखांवर, पिसांवर, मिशांवर त्यांना बसवून दूर दूर , उंच उंच जागांवर नेउन सोडले. त्यांनी जिथे जिथे परागकण टाकले, तिथे तिथे नवनवीन फुलं उमलू लागली. 

सूर्यानं सकाळी पाहिलं, तर सगळी सृष्टी फुलांबरोबर डोलत होती. तो समाधानानं हसला. पर्वत, झाडं झुडुपं, पशु पक्षी, कीडे - कीटक, वारा , पाणी सारे खुशीनं नाचत होते. वारा तर भलताच खुश होता.  त्याला आता त्याच्या मनासारखं अगदी नाजुकसं, कधीही न संपणारं विशेष काम मिळालं होतं ! 

आजही नित्यनेमानं वारा, पाणी, कीटक, पशु, पक्षी परागकणांची इवली इवली गाठोडी आपल्यासोबत दूर दूर वाहून नेत आहेत आणि सृष्टीला सजवत आहेत. तुम्हालाही कधी एखाद्या पहाटे तुमच्या उशीजवळ जर सापडलंच एखादं परागकणांचं गाठोडं, तर पोहोचतं कराल न ते तुमच्या बागेतल्या झाडाकडे ? पण हळूच हं, कदाचित त्या धुक्यातल्या पहाटे ती झाडं अगदी गाढ झोपेत असतील !




५ मार्च, २०१४ 

2 comments: